विधी सेवा सप्ताहाचा समारोप

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विधी सेवा सप्ताहाचा समारोप येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. तसेच या सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत विधी सेवा प्राधिकरण ‘जिथे जिथे-अन्यायाला वाचा फुटेल तिथे तिथे,‘ ‘क्षेत्र एक ठेवा ध्यानी – पिण्यासाठी स्वच्छ पाणी,‘ ‘निरक्षर होऊन का जाता अंधारात – शिक्षित होऊन या उजेडात,‘ ‘बेटी बचाव – बेटी पढाव‘ अशा जनजागृतीपर घोषणा यावेळी देण्यात आल्या. या रॅलीत दिवाणी न्यायालयातील कर्मचारी, वकील या बरोबरच वेंगुर्ला हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विधी सेवा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेते प्रथम – रिया अनिल कुर्ले (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), द्वितीय – जान्हवी मडकईकर, तृतीय – ईशांत हेमंत चव्हाण (दोन्ही मदर तेरेसा स्कूल), उत्तेजनार्थ-चिन्मय शशांक मराठे, वेदांत नवीन गावडे (दोन्ही वेंगुर्ला हायस्कूल) यांना पमाणपत्र वाटप करण्यात आली. त्यानंतर अॅड.आरती गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बाळ दिनानिमित्त बालकांचे कायदे, हक्क व त्यांचे संरक्षण या विषयावर तर अॅड. श्रद्धा बाविस्कर यांनी मुलांचा शिक्षणाचा हक्क व रॅगिंगच्या कायद्यातील तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले. या विधी सेवा सप्ताह कालावधीत महिलांचे कायदे, कौटुंबिक कायदे, मुलांचे हक्क, शिक्षणाचे अधिकार यासह विविध विषयांवर कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरे तसेच पथनाट्ये तालुक्यातील विविध गावांमध्ये घेण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी व वकिलांनी चांगली मेहनत घेतली. तसेच त्या गावातील नागरिकांचाही या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे यावेळी दिवाणी न्यायाधीश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले व विधी सेवा सप्ताह यशस्वी केल्याबाबत सर्वांचे कौतुक केले. समारोप प्रसंगी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक बी.वाय.वाडीकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्यध्यापक पी.डी.कांबळे, सहाय्यक शिक्षक एस.एल.खाबडे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. फोटोओळी – विधिसेवा सप्ताह समारोप प्रसंगी आयोजित रॅलीत सहभागी झालेले दिवाणी न्यायाधीश श्रीम. पाटील यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page