*💫बांदा दि.२३-:* रोणापाल मुख्य रस्ता ते खेरकटवाडी, भरडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात सावंतवाडी तहसीलदारांची शिष्टाई अयशस्वी झाली. स्थानिक ग्रामस्थ व जमीनमालक यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याने रस्त्याचा प्रश्न अाणखीनच गुंतागुंतीचा बनला आहे. बुधवारी पुन्हा जमीनमालक व स्थानिकांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्थानिकांना दिले. रोणापाल खेरकटवाडी, भरडवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. पोलीस संरक्षणात सदर रस्ता बुधवारी मोकळा करून देण्याचे आश्वासन तहसिलदारांनी उपोषणकर्त्यांना दिले होते. परंतु सावंतवाडी तहसीलदार, बांदा पोलिस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही रस्त्याचा प्रश्न न सुटल्याने सदर रस्त्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह निगुडे तलाठी भाग्यशिला शिंदे, रोणापाल उपसरपंच भिकाजी केणी, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे, पोलिस पाटील निर्जरा परब, माजी सरपंच उदय देऊलकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे, बांदा पोलीस श्री. माने यांच्यासह जमीनमालक, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार म्हात्रे यांनी दोन्ही गटांची बाजू पुन्हा एकदा ऐकून घेतली. सदर रस्त्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी जमीनमालकही आग्रही झाले. काही बाबींची तडजोड केल्यास आम्ही गावाच्या हितासाठी रस्त्यास जमीन देण्यास तयार असल्याचे जमीनमालकांनी सांगितले. त्यावर दोन्ही बाजू विचारात घेऊन सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्य़ासाठी संबंधितांसह बुधवारी तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे तहसिलदारांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासनाशी केलेल्या चर्चेत गावाच्या हितासाठी आम्ही वैयक्तीक मतभेद बाजूला ठेवून सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सरपंच सुरेश गावडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सांगितले. त्यामुळे सावंतवाडी तहसिलदारांची रस्ताप्रश्नी शिष्टाई यशस्वी होणार की रस्त्याचा प्रश्न कायम राहणार याकडे रोणापाल ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
रोणापालमधील ‘त्या’ रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा!
