मच्छीमारांची व्यक्त केली नाराजी
*💫मालवण दि.२२ -:* केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारनी पारंपरिक मच्छीमारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. मच्छीमारांसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ठिकठिकाणच्या दीपस्तंभाचा प्रकाश मंदावला आहे. बंदरांमधील मार्गदर्शक दिवेसुद्धा बंद स्थितीत आहेत. मात्र दुसरीकडे एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा लखलखाट सुरू आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडून नेत आहेत. पण शासनाला पारंपरिक मच्छीमारांची फिकिर नाही, अशी टीका अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्गने केली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मालवण येथे पार पडली. यावेळी उपाध्यक्ष भाऊ मोरजे, हेमंत गिरप, तेजस्वीता कोळबकर, सरचिटणीस संजय केळुसकर, खजिनदार चैतन्य तारी, चिटणीस गोविंद केळूसकर, ललिता कुबल आदी उपस्थित होते. अनधिकृत मिनी पर्ससीन नेटद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी दहा वावाच्या आतमध्ये राजरोसपणे सुरू आहे. बेकायदेशीर एलईडी पर्ससीन नौकांचा स्थानिक बंदरांमध्ये मोकाट वावर सुरू आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण कायम आहे. मात्र या साऱ्या विध्वंसकारी अनधिकृत मासेमारीला मत्स्य विभागाची गस्ती नौका रोखु शकत नाही. सर्व लोकप्रतिनिधींचे वारंवार याकडे लक्ष वेधूनदेखील त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आल्याची माहिती श्री. मालंडकर यांनी दिली.
