नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना कार्यकाल संपण्यास दोन महिने असतानाच उपनगराध्यक्ष पदाचे महत्त्व समजले का?

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा सवाल

मालवण दि प्रतिनिधी नगराध्यक्ष पदानंतर उपनगराध्यक्ष पद हे महत्त्वाचे आहे याची जाणिव मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर याना पाच वर्षे संपण्यास दोन महिने असताना समजले का ? नगराध्यक्षांनी गेल्या साडे चार वर्षात कितीवेळा मला विश्‍वासात घेतले, कितीवेळा चर्चा केली ते जाहीरपणे सांगावे असे खुले आव्हान उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आज येथे पत्रकार परिषेदेत दिले हे आव्हान देतानाच श्री. वराडकर यांनी शिवसेना-भाजप युतीतून आम्ही दोघेही निवडून आलो. नगराध्यक्षही युतीचेच उमेदवार म्हणून निवडून आले. ते निवडून यावेत यासाठी आम्ही प्रामाणिक काम केले म्हणूनच ते नगराध्यक्ष पदाच्या खूर्चीवर विराजमान आहेत. त्यांनी युतीबरोबर गद्दारी केली नाही का? असा रोकडा सवालही त्यांनी केला मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष दालनात राजन वराडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी गटनेते गणेश कुशे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाची शान राखता येत नसेल तर ती घालवू तरी नये अशी टीका केली होती. यावर बोलताना श्री. वराडकर म्हणाले, नगराध्यक्षांनी गेल्या काही वर्षात आपल्या पदाची काय शान राखली याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. दोन वर्षापूर्वीचे आर्थिक व्यवहाराचे ऑडिओ, व्हिडीओ फुटेज,आजही उपलब्ध आहेत नगरपालिका महोत्सवाच्या शोभायात्रेत कोणार्क हॉटेलसमोर त्यांनी आपल्या पदाची शान शहरवासियांना दाखविली याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. पदाची शान राखणे म्हणजे काय हे अधिक स्पष्ट हे व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसून येईल. त्यामुळे नगराध्यक्षांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत. कॉलेज जीवनात केलेल्या आगळीकीमुळे त्यांना परिक्षेस बसू दिले नाही हे मालवणवासियांना माहित आहे. संबंधित शिक्षण विभागाच्या प्रमुखांनी याची जाहिर प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे पदाची शान कशाप्रकारे वाढवावी हे नगराध्यक्षांनी मला शिकवू नये. असा टोला हाणत श्री वराडकर म्हणाले, मला नागरिकांनी सलग दोन टर्ममध्ये निवडून दिले. सात वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. याउलट नगराध्यक्षांना आता राजकारणात पाच वर्षे होत आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून काम करताना नगराध्यक्षांनी काय दिवे लावलेत याचीही माझ्याकडे उदाहरणे आहेत. मात्र माझ्यावर असलेल्या चांगल्या संस्कारामुळे मी कोणाचे वैयक्तिक हनन होणार नाही याची काळजी घेत आहे. मला वैयक्तिक आरोप करण्यात स्वारस्य नाही असे ते म्हणाले मालवण दांडी किनारी ज्यादिवशी आग लागली त्यावेळी मी त्याठिकाणी गेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण त्यादिवशी मी बाहेर गावी गेलो होतो. मात्र मोठा गाजावाजा करून नगरपालिकेने घेतलेले फायर बॉल वापरले असते तर आग आटोक्यात आणली असती. आग विझण्यासाठी ८० ते ९० डिग्री सेल्सिअस तापमान लागते असे नगराध्यक्ष सांगत असतील तर आग लागलेल्या ठिकाणी ते थर्मामीटर घेऊन गेले होते का? फायर बॉल पालिकेत प्रदर्शनासाठी ठेवले आहेत का? अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने आग लागल्यास त्या फायर बॉलचा तरी वापर करा अन्यथा ते तुमच्यासारखे कुचकामी ठरतील अशी टीकाही श्री. वराडकर यांनी केली.

You cannot copy content of this page