कालव्यात पडलेला भराव उपसा न केल्यास पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन…

ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे इशारा

*दोडामार्ग / सुमित दळवी* तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षीही उजव्या कालव्यातील पाणी बंद आहे. त्यामुळे घोटगे, घोटगेवाडी, परमे येथील शेतकऱ्यांच्या केळीबागायती पाण्याअभावी सुकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोनाळकट्टा येथील शाखा अभियंता साठे यांना शुक्रवारी घेराव घातला. तसेच कालव्यात दोन ठिकाणी पडलेला भराव उपसा न केल्यास येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर घोडगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने केळी बागायती व अन्य पीक घेतात. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या चारही गावात लाखो केळीची लागवड केली जाते. बागायतीला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची जास्त आवश्यकता असते. अन्यथा केळीची रोपे सुकून जातात. ही उद्भवत असलेली परिस्थिती गेल्या तीन वर्षांपासून या विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना ज्ञात आहे. शिवाय गेल्या दोन वर्षात पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांना आंदोलन देखील करावे लागले होते. तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दर वर्षी कालव्याचे पाणी बंद होऊन केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.यावेळी संदीप दळवी,भरत दळवी,सतीश परब,विजय दळवी,भास्कर दळवी,महेश दळवी,सतीश दळवी आदी शेतकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page