*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पहिल्या दोन संशयित आरोपींची नावे नितीन श्रीधर सावंत व चंद्रकांत गणपत सावंत अशी आहेत. तर या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत नाईक यांची कन्या ऐश्वर्या संतोष नाईक यांनी आपल्या वडिलांना असत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली होती. डिंगणे माती उत्खनन प्रकरणी विचारलेल्या जाबातून घाबरून संतोष नाईक यांनी आत्महत्या केल्याचे ऐश्वर्या हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. बांदा पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली होती. त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपासादरम्यान साक्षीदारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसारआत्महत्या करण्यामागे आणखी एकाचा या प्रकरणाशी सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा संशयित आरोपी चंद्रकांत सावंत यांचा नातेवाईक असल्याचे समजते. आज पहिल्या दोन संशयितांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ॲड स्वप्नील कोलगावकर यांनी या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे वाढीव पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयासमोर ठेवली असता न्यायालयाने ही विनंती मान्य करून पोलीस तपासासाठी आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
