आडेली सरपंचपदी सेनेच्या प्राजक्ता मुंडये

थेट सरपंच सौ कुडाळकर यांच्यावर अविश्वास ठराव आल्याने पद होते रिक्त

*⚡वेंगुर्ले ता.१२-:* तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीच्या गेले १ वर्ष रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी आज निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात पूर्वी भाजपकडे असलेली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेत शिवसेने ग्रामपंचायतवर भगवा फडकवला असून सेनेच्या प्राजक्ता मुंडये या सरपंचपदावर विराजमान झाल्या आहेत. आडेली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच समिधा कुडाळकर यांचे विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झालेला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते. गेले वर्षभर या पदाचा पदभार उपसरपंच संतोष कसले यांच्याकडे होता. दरम्यान या सरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. संपूर्ण गावातून थेट निवड झालेले सरपंचपद पकडून एकूण १२ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद बाद असल्यामुळे ११ सदस्यांमधून ही निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेनेचे ९ सदस्य असल्याने प्राजक्ता मुंडये सरपंचपदावर बिनविरोध निवडून आल्या तर भाजपचे २ सदस्य या निवड प्रक्रियेला अनुपस्थित होते. या निवड प्रक्रियेवेळी उपसरपंच संतोष कासले, ग्रामपंचायत सदस्य लीलाधर मांजरेकर, छाया गावडे, ज्ञानेश्वरी डीचोलकर, रामचंद्र आडेलकर, सौ. धुरी, सौ. होडवडेकर, श्यामसुंदर नाईक उपस्थित होते. यावेळी अध्यासी आधीकरी म्हणून कृषी विस्तार अधिकारी संदेश परब यांनी काम पाहिले. दरम्यान आडेली ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ मुंडये यांचे स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, युवासेनेचे मीतेश कोंडस्कर, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, चंद्रकांत गडेकर, सचिन गडेकर, स्वप्नील गडेकर, सागर गडेकर, नितीन मांजरेकर, प्रवीण गडेकर, दत्ताराम मुंडये यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page