*नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरातील गार्डन, मैदाने, इनडोअर गेम्स व व्यायामशाळा नगरपरिषदेने आजपासून सुरक्षिततेचे नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली करावीत, अशी मागणी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नाईक यांनी म्हटले की, ७ ऑक्टोबरपासुन महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे खुली करून बाजारपेठा व दैनंदिन व्यवहार विषयक बहुतांशी निर्बंध उठवले आहेत. त्याच धर्तीवर नगरपरिषदेने सावंतवाडी शहरातील मैदाने, इनडोअर गेम्स, व्यायाम शाळा, गार्डन पूर्ण क्षमतेने खुली केल्यास शहरातील अबाल वृद्धाना दिलासा मिळेल व पर्यायाने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सबळ होईल. त्यामुळे याचा विचार करून सावंतवाडी नगरपरिषद अखत्यारीतील सर्व मैदाने, इनडोअर गेम्स, हॉल, व्यायामशाळा व बागबगिजे सुरक्षितेचे नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली करावित व शहरातील नागरिकांना सकारात्मक दिलासा द्यावा, अशी मागणी नाईक यांनी निवेदनातून केली आहे.
