रेडी नदी किनारी सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

वेंगुर्ला: तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी आज रविवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटली नसल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. रेडी येथील नदीत सायंकाळी मच्छिमारी करत असताना येथील स्थानिकांना किनारी मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ स्थानिक जि. प सदस्य प्रितेश राऊळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. यानुसार प्रितेश राऊळ यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस आर. बी. दळवी, दिपा धुरी, ए.व्ही. नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही महिला साधारण ४२ ते ४५ वयाची असुन शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रात्री उशिरा पोलिसांमार्फत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही माहिती मिळताच वेंगुर्ला उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, ग्रा. पं. सदस्य कौशिक परब यांनी घटनास्थळी घेतली धाव घेतली. हा मृतदेह नेमका कोणाचा हे पोलीस तपासात पुढे स्पष्ट होईल.

You cannot copy content of this page