कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले कौतुक
*⚡कणकवली ता.१०-:* विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सुशिक्षित व सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे हे शिक्षक करीत असतात. त्यांचे हे कार्य पवित्र असून शिक्षकांच्या त्यागीवृत्तीमुळे घरोघरी ज्ञानगंगा पोहोचत असते. कोणताही पुरस्कार सहज मिळत नसतो, तो पुरस्कार मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन चांगले काम दाखवावे लागते. तेव्हाच तो पुरस्कार मिळत असतो. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे प्रेम हाच सर्वोकृष्ट पुरस्कार असतो. तसेच सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार आदर्श पुरस्कारचा उपक्रम स्तुत्य असून पवार गुरुजींचा ज्ञानदानाचा व सेवाभावी कार्याचा वसा सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम त्यांचे कुटुंबीय करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे पहिला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांना वेदांत इमेजिंन सेंटर कणकवली येथे प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्री. पवार बोलत होते. यावेळी नरवडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मनोहर काजरेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव श्रीमती शुभांगी पवार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रदीप मांजेरकर, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, संदीप जाधव, रुची कवटकर, सुरेश पवार , हरिश्चंद्र सरमळकर, प्रभाकर पवार,पत्रकार राजन चव्हाण, नुपूर पवार, संगीता सरमळकर, ऋजुता चव्हाण, वैशाली कदमआदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, तुमच्या जवळ 1 रुपया असेल तर त्यातील 50 पैसे भाकरीसाठी खर्च करा तर उर्वरित 50 पैशातून पुस्तक खरेदी करा, भाकरी तुमची भूक भागवेल, पुस्तके तुम्हाला जगवेल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. कोणतेही काम करताना तन, मन,धन स्वतःला झोकून केल्यास त्यात यश प्राप्त होते. तसेच सदाशिव पवार यांचा ज्ञानदानाचा वसा पुढे नेण्याचे काम त्यांचे कुटुंबीय करीत असून त्यांचे हे अखंडितपणे सुरू रहावे, असे सांगून त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करताना आलेल्या अनुभव उपस्थितांना कथन केला. मनोहर काजरेकर म्हणाले, सदाशिव पवार यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे. विद्यार्थ्यांचे प्रेम हा शिक्षणासाठी सर्वोच पुरस्कार असतो. शिक्षक हा पवित्र पेशा असून सदाशिव गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीयआदर्श शिक्षक पुरस्काराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सदाशिव पवार यांचा ज्ञानदानाचा आणि सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचे काम त्यांचे कुटुंबीय पुढे करत असल्याबद्दल मला अभिमान आहे. प्रतिभा कोतवाल म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात मी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीत माझे पती खंडेराव कोतवाल यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी वेळोवेळी मला दिलेल्या प्रोत्सहान व खंबीरपणे दिलेल्या पाळबळामुळे मी प्रतिभावंत शिक्षक होऊ शकली. तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकायचे असेल त्यांनी स्वतःला नेहमीच अपडेट ठेवले पाहिजे आणि स्पर्धा परिक्षांना न घाबरता सामोरे जावे. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानने मला आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता व्यक्त करत शिक्षण म्हणून काम करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. यावेळी प्रदीप मांजरेकर, गिल्बर्ड फर्नांडिस, संदीप जाधव, रुची कवटकर, सरिता पवार यांनी मनोगत व्यक्त करून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रतिभा कोतवाल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आरंभी मानपत्राचे वाचन संगीता सरमळकर यांनी केल्यानंतर प्रतिभा कोतवाल यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 5 हजार, मानपत्र , श्रीफळ, शाल असे स्वरुप असलेला आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कदम यांनी केले. आभार वैशाली कदम यांनी मानले.
