*💫मालवण दि.२०-:* श्री संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करताना त्याद्वारे समाज स्वच्छ करण्याची शिकवण दिली आहे. म्हणूनच स्वच्छतेचा संकल्प स्वतः आचरणात आणून हळूहळू आपल्या आजूबाजूचा समाज स्वच्छ करावा. गाडगे महाराजांची स्वच्छतेची शिकवण समाजात रुजवावी, असे प्रतिपादन श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ मालवणचे माजी उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, मालवण यांच्या वतीने श्री संत गाडगेमहाराज पुण्यतिथी कार्यक्रम मालवण देऊळवाडा आडवण येथील उत्तम चव्हाण यांच्या निवासस्थानी पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक चव्हाण हे बोलत होते. यावेळी श्री संत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नामस्मरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक चव्हाण परीट समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन वालकर, सचिव विनायक चव्हाण, खजिनदार कृष्णाजी परूळेकर, विजय नेमळेकर, लक्ष्मण कोळंबकर, सुजित नेमळेकर, किरण चव्हाण, महेश परीट, सौ. उज्वला चव्हाण, सौ. अंकिता नेमळेकर, जयवंत चव्हाण, गोपाळ चिंदरकर, उत्तम चव्हाण, अनिल चव्हाण, सुभाष चव्हाण, नारायण म्हापणकर, सुरेश चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. परीट समाज सेवा संघाच्या सभासदांनी एकजुटीने काम करून संघटना मजबूत बनवावी तसेच संत गाडगे महाराजांचे विचार आणि संघाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे यावेळी मोहन वालकर यांनी सांगितले. यावेळी संग्राम कासले तसेच विद्यार्थिनी माधवी चव्हाण यांनी गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित विचार मांडले. यावेळी परीट संघाच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच दहावी बारावी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. तसेच ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुरेश चव्हाण यांनी केले. तर आभार लक्ष्मण कोळंबकर यांनी मानले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क लावून व शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
गाडगे महाराजांचे स्वच्छतेचे विचार समाजात रुजवा – दीपक चव्हाण
