पाडलोस-केणीवाडा येथिल घटना; शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान : काजू बागायतदारही चिंतेत
*💫बांदा दि.२०-:* ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा दुसऱ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पाडलोस-केणीवाडा येथे चार ते पाच गव्या रेड्यांनी शेतकरी हर्षद परब यांच्या वायंगणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उपद्रवी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. बांदा-शिरोडा मार्गावर गेले काही दिवस गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या गवे फिरत असल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी हर्षद परब यांनी हजारो रुपये खर्च करून वायंगणी शेती केली आहे. शनिवारी रात्रो सुमारे चार ते पाच गवे रेडे आपल्या शेतात येऊन संपूर्ण मेहनत पायदळी तुडविल्यामुळे सुमारे 20 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे हर्षद परब यांनी सांगितले. तसेच वनविभागालाही याची कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.
