सत्ताधारी आणि विरोधक चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले

विमानतळ जोड रस्त्याचे काम सुरू न झाल्यास मनसे आंदोलन करणार: परशुराम उपरकर

*⚡कणकवली ता.३०-:* चिपी एअरपोर्टने येणारा प्रवासी दीड तासात चिपीला उतरेल खरा पण त्याला घरी जायला खड्डेमय रस्त्यांमुळे आणखी 3 तास लागतील. सत्ताधारी आणि विरोधक मात्र केवळ चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले आहेत.चिपी विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याला पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केलेला साडेसात कोटीचा निधी पूर्वानुभव पाहता मिळेल की नाही याबाबत शंका असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. जाहीर केल्यानुसार या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास मनसे आंदोलन करणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिला. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, चिपी विमानतळावरून शिवसेना व भाजपा या दोन पक्षांमध्ये श्रेयावरून राजकारण सुरू आहे मात्र रस्त्याच्या प्रश्नाबाबत गांभीर्य राहिले नाही आज जशी दिवा पॅसेंजरमुळे येणारा प्रवासी कोकणात अवघ्या 100 रुपयांत येतो मात्र त्याला घरी जाण्यासाठी आणखी शेकडो रुपये मोजावे लागतात. तशीच अवस्था चिपी विमान प्रवासाची असणार आहे. चिपी विमानतळ प्रवासी सेवा किती काळ चालेल हे अधांतरी आहे. चिपी येथील विमानात 35 प्रवाशांनाच 2500 रुपये तिकीट मिळणार आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये नाहक गैरसमज निर्माण करू नये असेही माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची स्वतंत्र निर्मिती होऊनही अद्याप जिल्हा आरोग्य अधिकारी पद अस्थायी आहे. यावरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत सत्ताधाऱ्यांची अनास्था दिसून येत असल्याची टीका उपरकर यांनी केली. चिपी विमानतळाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर खासदार राऊत पुन्हा आढावा घेतात.हा आढावा केवळ फोटो आणि बातमीसाठी असतो. जिल्ह्यातील एका विभागातील रिक्त असलेल्या अभियंत्यांमुळे प्रलंबित कामे राहत आहेत. सक्षम अधिकारी दर्जाचे अभियंता नसतील तर कामे प्रलंबित राहणारच. मात्र अपुऱ्या मनुष्य बळाचा विचार न करता सत्ताधारी या अधिकाऱ्यांना कात्रीत पकडत असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page