*⚡मालवण ता.२९-:* मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी या सुमारे दोनशे ते तीनशे लोकवस्ती असणाऱ्या वाडीला नळपाणी योजनेतून होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यामुळे होणारी ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन मालवण पंचायत समितीचे गटनेते श्री. सुनील घाडीगांवकर यांनी या वाडीत स्वखर्चाने नळपाणी योजनेला पाच हजार लीटरची टाकी व टाकी ठेवण्यासाठी धक्का उभारून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. काही दिवसापूर्वी ओवळीये सडा येथे श्री. घाडीगांवकर यांनी स्वखर्चाने रस्ता करून दिल्यानंतर आता पुन्हा एकदा श्रावण गवळीवाडीच्या ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सोडविल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. श्रावण गवळीवाडी येथे २०० ते ३०० लोकवस्ती असलेल्या भागात शासनाच्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणीपूरवठा होतो. मात्र याठिकाणी बसवण्यात आलेल्या ५ लिटर टाकीतून होणारा पाणीपुरवठा ग्रामस्थांना पुरेसा ठरत नाही. अपुरा व खंडित होणारा पाणीसाठा वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू होती. शासन दरबारी पाठपुरावा करूनही काम होत नव्हते. अखेर सुनील घाडीगांवकर यांनी ५ लिटरची पाण्याची टाकी तसेच टाकी ठेवण्याची क्षमता असलेला धक्का उभारणी स्वखर्चाने करून दिला आहे. अशी माहिती श्रावण सरपंच तथा भाजप विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांनी दिली आहे. यापुढे एकत्रित स्वरूपात १० हजार लिटर क्षमतेने गवळीवाडीला पाणीपुरवठा होणार असून सतत खंडित होणाऱ्या व अपुऱ्या पाणीपुरवठा समस्येतून ग्रामस्थांची सुटका झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सुनील घाडीगांवकर यांचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते या नव्या कामाचा शुभारंभ गटनेते सुनील घाडीगांवकर व सुशांत घाडीगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष शाम परब, सुनील गावडे, प्रशांत सावंत, मंगेश यादव, विजय पुजारे, आबा पुजारे, नारायण बगाड, बाबाजी सावंत, प्रभाकर कावले, योगेश नाटेकर, प्रथमेश सावंत, एकनाथ पुजारे, सूर्यकांत सावंत, विनायक कावले, सतीश सडेकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रावण गवळीवाडीत सुनील घाडीगांवकर यांनी दिली पाण्याची टाकी
