विविध मागण्यांसाठी केंद्रप्रमुख संघटनेचे आंदोलन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर अनेक वर्षे प्रलंबित आहेत . या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तर या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र प्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करावा, केंद्रप्रमुखांना वर्ग दोनची पदोन्नती मिळावी, केंद्रप्रमुखांना सेवानिवृत्तीच्या वेळेस अर्जित रजेच्या रोखीकरनाचा लाभ मिळावा, शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-2 पदोन्नतीसाठी फक्त केंद्रप्रमुख यांचा विचार व्हावा तसेच या पदोन्नतीसाठी ५० टक्के गुणांसह उत्तीर्णतेची अट शिथिल करण्यात यावी, केंद्रप्रमुख यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करावी, अभावित केंद्रप्रमुख यांना कायम करावे, सध्या केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागांमुळे जादा केंद्राचा प्रभाव असणाऱ्या केंद्रप्रमुखाना अतिरिक्त वेतन द्यावे, प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन केंद्रप्रमुखाना दरवर्षी गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्काराने गौरविण्यात यावे. आदी प्रमुख मागण्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रप्रमुख संघाच्यावतीने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना देण्यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शिवाजी पवार, सरचिटणीस शिवाजी गावित, कोकण विभाग प्रमुख मधुकर आईर, रामचंद्र वालावलकर, डी एन पावरा, संजय पवार, नारायण देशमुख, श्रद्धा महाले, शुभांगी दळवी, गोपाळ जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख या आंदोलनात सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page