राष्ट्रीय लोक अदालतीत ५४६ प्रकरणे तडजोडीने मिटली

ओरोस-:२०२१ मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (ता.२५) जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ७०४० प्रकरणांपैकी ५४६ प्रकरणांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समझोता झाला आहे. यातून एकूण ४ कोटी २७ लाख ४९ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी बी म्हालटकर यांनी दिली.         विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत दर तीन महिन्यानी राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. मात्र राज्यात कोरोनाचा कहर पसरल्याने डिसेंबर २०२० नंतर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली नव्हती. कोरोना चा कहर कमी झाल्याने तब्बल ७ महिन्यानंतर ऑगस्ट मध्ये २०२१ मधील पहिली लोक अदालत घेण्यात आली होती. त्यानंतर आता यावर्षीची दुसरी राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (ता.२५ सप्टेंबर ) रोजी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. आपापसातील वादांना तडजोडीने पूर्णविराम देण्यासाठीच्या या लोकअदालतीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयासह एकूण आठ न्यायालयांमध्ये दाखलपूर्व ४३५६ व दाखल २६८४ अशी एकूण ७०४० प्रकरणे ठेवण्यात आली होती.       यापैकी दाखल पूर्व ३०३ प्रकरणांमध्ये समझोता झाला आहे. यामधून ९८ लाख ५१ हजार १५२ रुपये वसूल करण्यात आले. तर दाखल प्रकरणांपैकी २४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामधून ३ कोटी २८ लाख ९८ हजार ४४८ रुपये वसूल करण्यात आले.       दाखल पूर्व व दाखल अशा एकूण ५४६ प्रकरणांमध्ये समझोता झाला असून त्यातून ४ कोटी २७ लाख ४९ हजार ६०० रुपये वसुल करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page