प्लेटलेट दान करीत रुग्णाला दिले जीवदान
मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला प्लेटलेट दान करून सामाजिक कार्यकर्ते ऍड. रुपेश परुळेकर यांनी जीवनदान दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी प्लेटलेट रुग्णाला देण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे नातेवाईकांनी सांगत ग्लोबल रक्तदाते मालवण या संस्थेचे रुग्णाच्या कुटुंबियांना आभार मानले. मालवण येथील झाटये हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला शुक्रवारी प्लेटलेट काऊंट कमी झाल्याने तात्काळ ‘एसडीपी डोनर’ची गरज होती. याबाबत ग्लोबल रक्तदाते मालवण संस्थेच्या वतीने रक्तदात्यांना आवाहन केले असता रुपेश परब (पोलीस), ऍड. रुपेश परुळेकर, नगरसेवक मंदार केणी, अनंत पाटकर, नितेश मांजरेकर, रोहन मोरे, ओंकार गावडे, ओंकार प्रभू हे आठ रक्तदाते पडवे लाईफ टाईम रुग्णालयातील ब्लड बँक येथे पोहोचले. ओरोस येथील पोलीस अंमलदार रुपेश परब हे प्लेटलेट दान करण्यासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र पडवे रुग्णालयात दाखल असलेल्या देवगड येथील रुग्णासाठी रक्ताची आवश्यकता होती ती त्यांनी रक्तदान करुन पूर्ण केली. तर मालवण येथील रुग्णाला प्लेटलेट दान करण्यासाठी ऍड. रुपेश परुळेकर (कट्टा) हे पात्र ठरले. परुळेकर यांनी प्लेटलेट दान करून ‘त्या’ रुग्णाला जीवनदान दिले. यावेळी अनंत पाटकर आणि नितेश मांजरेकर हे प्लेटलेट दानासाठी पात्र ठरले असून त्यांना पुन्हा गरज लागल्यास बोलावण्यात येईल,असे सांगण्यात आले. ग्लोबल रक्तदाते टीमच्या वतीने पडवे येथील रुग्णालयात जाऊन निस्वार्थी रक्तदान व प्लेटलेट दान केलेल्या रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. तसेच अमेय देसाई, केदार देसाई, रुपेश तायशेटे, किशोर नाचणोलकर व रोहित चव्हाण यांनी रक्तदाते शोधण्याकरता मेहनत घेतली. फोटो : ऍड. रुपेश परुळेकर यांनी पडवे रुग्णालयात जाऊन गरजू रुग्णासाठी प्लेटलेट दान केले.
