देवगड तालुक्यामध्ये वेब मालिकेचे चित्रीकरण

देवगडचे निसर्गसौंदर्य भुरळ पडणारे- दिग्दर्शक अमित कोळी

*⚡देवगड ता.२५-:* देवगड तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला पर्यटकांना आकर्षित करणारा,असून या तालुक्यात गेले चार ते पाच दिवस वेब मालिकेचे चित्रीकरण चालू होते. पाच भागांची ही वेब मालिका असून ’13 डेज ऑफ लव’ असे त्याचे नाव असणार आहे. गणराज प्रोडक्शन या बॅनरखाली ही वेब मालिक बनत असून श्रेयश जाधव हे त्याचे निर्माते आहेत तर, चेतन मुरूमकर यांच्या ए.के. क्रिएशन या प्रोडक्शन टीम च्या माध्यमातून या वेब मालिकेचे चित्रीकरण होत आहे. यामध्ये अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता राहुल मगदूम, अभिनेता चिन्मय संत, आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तरी यामध्ये काही प्रमाणात मालवणी भाषेचा देखील समावेश असून याच्या निर्मितीसाठी स्थानिक कलाकार राजेंद्र बोडेकर आणि ऋत्विक धुरी यांनीदेखील ए.के. क्रिएशन सोबत या मालिकेच्या निर्मितीसाठी काम पाहिले आहे. दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून ही वेब मालिका छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. दिग्दर्शक अमित कोळी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीची व सामाजिक संदेश देणारी कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी तयार करत असतात. अशाच प्रकारची युवा पिढी वर आधारित ही मराठी वेब मालिका असून एम.एक्स प्लेयर या ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेब मालिकेचे ७० टक्के चित्रीकरण हे देवगड तालुक्यामध्ये झाले असून उर्वरित चित्रीकरण सातारा येथे होणार आहे. कुणकेश्वर, मिठमुंबरी, देवगड, विमलेश्वर, पडवणे अशा देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी भागात याचे चित्रीकरण झाले आहे. या टीमचे नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या . देवगडचे निसर्ग सौंदर्य हे चित्रपटसृष्टीसाठी व सर्वच निर्मात्यांसाठी भुरळ पाडणारे असून, भविष्यातही देवगडचा चित्रपट निर्मितीसाठी अधिक विचार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अमित कोळी यांनी व्यक्त केली आहे. तरी या वेब मालिकेची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

You cannot copy content of this page