विविध मागण्यांसाठी शिक्षक-शिक्षकेत्तरांचे आंदोलन

जिल्हा परिषदेसमोर वेधले प्रशासनाचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही याबाबत शासनाकडून निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, सचिव पांडुरंग काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उमेश सुकी, नारायण माने, अजय शिंदे, विजय मयेकर ,अश्विनी गरजे, गुरुनाथ पेडणेकर, ज्योती वाडकर, तानाजी पाटील, आधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध १७ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कोविड-१९ संक्रमित दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय आर्थिक लाभ व अनुकंपा योजनेखाली कायम नोकरी देण्यात यावी, सर्व मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना भविष्य निर्वाह व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात यावी, अनुदानासाठी अघोषित शाळा, तुकड्यांना अनुदान मंजूर करण्यात यावे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. प्रलंबित संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव त्वरित दुरुस्ती करून मिळावे, कार्यभारानुसार कला व क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात्, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी. इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेस जोडणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात. यासह विविध मागण्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या असून या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तर याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनात सादर करण्यात आले.

You cannot copy content of this page