तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची टीका
*⚡मालवण ता.३०-:* तळाशील बंधाऱ्याच्या कामासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दहा दिवसांत १० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तळाशीलवासीयांना दहा कोटी निधीचे पत्र हाती पडेल अशी आशा होती. मात्र राणेंचे हे आश्वासन पोकळ ठरले असून एक दमडीही मिळालेली नाही. राणेंचे आश्वासन हवेत विरले असून या निमीत्ताने कोण खरे आणि कोण खोटे हे सिद्ध झाल्याची टीका शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, निलेश राणेंनी १० कोटीचे आश्वासन दिलेले असताना शिवसेनेने तळाशील वासीयांना मूठभर साखर दिली आहे, मात्र ही साखर खरी होती. आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी निधीच्या माध्यमातून तळाशील बंधाऱ्याचे १८० मीटरचे काम सुरू असून शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासाची गती कायम राहणार आहे, असेही हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भाई गोवेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेविका सेजल परब, नगरसेवक पंकज सादये, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, अनंत पाटकर, संमेश परब, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, तळाशील बंधाऱ्यासाठी निलेश राणे यांनी १० कोटी देण्याचे आश्वासन खोटे ठरले आहे. जनआशीर्वाद यात्रेचे अनेक दौरे झाले. आचरा येथील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तळाशील वासीयांना या निधीची अपेक्षा होती. मात्र शिवसेना, आमदार, खासदार पालकमंत्री यांच्यावर टीका करण्याव्यतिरिक्त या यात्रेत काही झाले नाही. त्याठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ आपली पाठ थोपटून घेण्याचे काम केले. १० कोटीच्या आश्वासनाची पूर्तता काही झाली नाही. दिलेली आश्वासने ती पूर्ण करण्याची ताकद भाजप नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ठेवावी. आज शिवसेना व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातुन सुमारे १ कोटी निधीतून बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. हा निधी छोटा असला तरी काम होत असल्याने तळाशीलवासीय समाधानी आहेत असेही हरी खोबरेकर म्हणाले. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग येथील जिओ ट्यूबच्या कामावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हरी खोबरेकर म्हणाले, उपरकर यांच्या टिकेकडे आम्ही लक्ष देत नाही. देवबागच्या किनाऱ्यावर सँड बार तयार व्हावेत यासाठी जिओ ट्यूब घालण्यात आल्या होत्या. या ट्यूबमुळे सँड बार तयारही झाले आहेत. मात्र जिओ ट्यूब फाटल्यामुळे या त्याबाबत कोणतीही दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ठेकेदारचे पुढील बिल देण्यात येऊ नये अशी मागणी पतन विभागाकडे आम्ही केली आहे. तसेच या कामाची त्रयस्थ समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे अशी, असेही हरी खोबरेकर यावेळी म्हणाले. देशात वाढलेल्या महागाई वर केंद्र सरकार कोणतेही लक्ष देत नाही. पेट्रोल, डिझेल दरवाढ, घरगुती गॅस इंधन दरातील वाढ यामुळे जनतेला अनेक त्रास भोगावे लागत आहेत. या प्रश्नाबाबत शिवसेना जनतेसाठी लढणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
