कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करा

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नियोजन बैठकीत आवाहन

मालवण (प्रतिनिधी) गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सव काळात मालवणात नागरिकांसह, व्यापारी बांधवांनी कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेत हा उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज मालवण नगरपालिकेत नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, दीपक पाटकर, पंकज सादये, नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, सचिव रतन पांगे, सुहास ओरसकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्‍वास गावकर, सचिव जयश्री हडकर, नाना साईल, रवी तळाशीलकर, संमेश परब, महावितरणचे अधिकारी श्री. भुजबळ, रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी मालवण शहरातील गणेशोत्सव नियोजनाबाबत चर्चा झाली. या चर्चेत दि. ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी वाहतूक मार्ग, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. यात सागरी महामार्ग येथे खासगी बस, ट्रक, अवजड वाहने थांबविणे, पार्किंग असेल, नाट्यगृह आवार येथे खासगी वाहनांची पार्किंग व्यवस्था असेल. टोपीवाला हायस्कूल येथे खासगी चार चाकी वाहने, टेम्पो पार्किंगची व्यवस्था असेल. बांगीवाडा येथे सहा आसनी रिक्षा, टेम्पो, कार पार्किंग व्यवस्था असेल. सारस्वत बँक नजीक एका बाजूने मोटारसायकल पार्किंग व्यवस्था असेल. मशीदगल्ली लगतच्या रस्त्यावर सायकल पार्किंग असेल. बंदर जेटी परिसर सारस्वत बँकेकडील अतिरिक्त रिक्षांसाठी पार्किंग असेल. सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता तीन आसनी रिक्षा व हातगाड्यांसाठी असेल. राणे मेडिकल मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल, सायकल फक्त मशीदगल्लीपर्यत नेता येईल. हॉटेल सागर किनारा रस्ता एका बाजूने रिक्षा थांबा असेल. सारस्वत बँक रिक्षा थांबा, बॉम्बे टेक्सटाईल्स फक्त सायकल, अन्य वाहनांना प्रवेश बंद, नेरूरकर गल्ली सर्व वाहनांसाठी बंद, धक्का जेटी सर्व वाहनांसाठी पार्किग असेल. भरड नाका ते स्टेट बँक बाजारपेठ रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किग बंदी असेल असे स्पष्ट करण्यात आले. सागरी महामार्ग जंक्शन, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका, भरड नाका, बॉम्बे टेक्सटाईल्स नाका, सकपाळ नाका, सारस्वत बँक नाका, जेटी नाका, फोवकांडा पिंपळ नाका, राणे मेडिकल नाका, कोळंब-सागरी महामार्ग नाका याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असतील. गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस, पाचवा, सातवा, अनंत चतुर्दशी, अकराव्या दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर सोमवार पेठ रस्त्याने सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. शहरातील खड्डेमय रस्ते, पथदिव्यांची दुरूस्ती यासारखे प्रश्‍नही गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावावेत अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page