तहसीलदार अजय पाटणे यांची यशस्वी मध्यस्थी;संजय केळुसकर यांनी दिली माहिती
*⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावच्या किनाऱ्याच्या बाजूने कायमस्वरूपी बंधारा व्हावा तसेच तळाशील रेवंडी खाडी पट्ट्यातील वाळू उपसा बंद करण्यात यावा या मागणीसाठी गेले दोन दिवस सुरू असलेले तळाशील वासीयांचे बेमुदत उपोषण आज रात्रौ उशिरा मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या यशस्वी मध्यस्थीने शुक्रवार दि. २० ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याविषयीची माहिती तळाशील ग्रामविकास मंडळाचे संजय केळुसकर यांनी दिली आहे. तळाशील येथे समुद्र किनाऱ्याच्या बाजूने ६५ मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या कामास शुक्रवारी सुरुवात करण्यात येईल तसेच वाळू उपसा बंदी बाबत प्रशासन पातळीवर कार्यवाही करून तो उपसा बंद करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार श्री. पाटणे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर हे उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाबरोबरच मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर, दशरथ कोचरेकर, संजय तारी, ताता टिकम, विकी तोरसकर व अन्य जणांनी चर्चेत भाग घेतला. शुक्रवार पासून बंधाऱ्याच्या कामास सुरुवात न झाल्यास शनिवार पासून स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थानी दिला आहे. आज सकाळी आमदार वैभव नाईक यांनी तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी ग्रामस्थांबरोबर केलेल्या चर्चेनंतर प्रशासकीय घडामोडींना वेग आला.
