खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानेच कळणे खाण दुर्घटना*

घुंगुरकाठी’ अध्यक्ष सतीश लळीत यांचा आरोप

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१३-:* कळणे खाणीचा बांध कोसळून २९ जुलै रोजी जो उत्पात झाला, तो काही अकस्मात झालेला नाही. ही परिस्थिती येणार, याची चुणुक २४ एप्रिल २०१९ रोजीच दिसली होती. यादिवशी खाणीच्या अंतर्भागातील एक कडा खाणीत काम करणाऱ्या पोक्लेन मशिनवर कोसळून झालेल्या अपघातात पोक्लेन चालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. हा अपघात ‘टाळता येण्यासारखा’ होता याची स्पष्ट कबुलीच केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा महासंचालनालयाने देऊन धोक्याचा इशारा दिला होता. पण या इशाऱ्याकडे खाण व्यवस्थापन, खनिकर्म विभाग यांनी दुर्लक्ष केल्यानेच २९ जुलैची दुर्घटना घडली, असा आरोप ‘घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री. लळीत यांनी म्हटले आहे की, २९ जुलैला कळणे खाणीतील कडे खाणीच्या अंतर्भागात कोसळून त्यातील चिखलपाण्याच्या दबावाच्या रेट्याने बांध फुटला व हे पाणी नागरिकांच्या घरात व शेतात जाऊन अतोनात नुकसान झाले. ही घटना अपघात असला तरी तो एकाएकी झालेला नाही. अशाच प्रकारे कडे कोसळण्याची घटना २४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १०.४५ वाजता कळणे खाणीत घडली होती. या अपघातात एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता तर दुसरा आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाला. यावेळी खाणीत नेमके काय घडले, हे कळायला मार्ग नव्हता. कारण खाणीचा अंतर्भाग हा प्रवेश निषिद्ध भाग असल्याने सर्वसामान्य माणसाला आत प्रवेशच नसतो. त्यामुळे या अपघाताची छायाचित्रे मिळणे शक्य नव्हते. मात्र खाणीत कोणताही अपघात रिपोर्ट झाला की तात्काळ केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा महासंचालनालयाचे (डायरेक्टोरेट जनरल ऑफ माईन्स सेफ्टी – डीजीएमएस) पथक अपघातस्थळाला भेट देऊन त्याची चौकशी करते. त्यानुसार या अपघाताची त्यावेळी चौकशी झाली होती. या अपघाताचा छायाचित्रांसह ‘इशारा’ देणारी सावधगिरीची सूचनाच (कॉशन नोटिस) आता संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे आणि ‘हा अपघात टाळता येण्यासारखा होता’, असे या इशारा सुचनेत स्पष्टपणे म्हटले आहे. या इशारा सुचनेमध्ये दोन वर्षापुर्वीच्या या अपघाताची चार छायाचित्रे देण्यात आली आहेत. खाणीतील ५५ मीटर लांबीचा, ५ ते ६ मीटर रुंदीचा आणि ५८ मीटर उंचीचा कडा कोसळून हा अपघात झाला व यात एक कर्मचारी दगावला व दुसरा जीव वाचवण्यात यशस्वी झाला, असे या अहवालात म्हटले आहे. या अधिकृत छायाचित्रांमध्ये खाणीचे खोदकाम करताना बेंचमार्कचा नियम योग्य पद्धतीने पाळला गेलेला नाही आणि उत्खनन करताना उभे कडे तयार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकप्रकारे खाण सुरक्षा महासंचालनालयाने याला दुजोराच दिला आहे. याचाच अर्थ ही खाण धोकादायक ठरणार आहे, याचा अंदाज महासंचालनालयाला आला होता. तशी सावधगिरीची सुचनाच त्यांनी दिली होती. तथापि, खाण व्यवस्थापन, यानिकर्म विभाग यांनी याकडे पुर्णपणे डोळेझाक केली. परिणामी २९ जुलैची दुर्घटना घडली, हे आता स्पष्ट झाले आहे. ही सावधगिरी सूचना आजही महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पहायला मिळते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता या अपघाताला खाण व्यवस्थापन व त्याकडे डोळेझाक करणारा खनिकर्म विभागच जबाबदार आहे, हे स्पष्ट होते. महासंचालनालयाच्या सावधगिरी सुचनेची दखल घेऊन खनिकर्म विभागाने जर उत्खनन थांबविण्याचे आदेश दिले असते तर पुढचा उत्पात टळला असता. ही एकंदर परिस्थिती व खाण सुरक्षा महासंचालनालयाचा सावधगिरी इशारा पाहता केवळ दुर्लक्षामुळे हा अपघात घडला हे उघड होते. प्रत्येक अपघातानंतर महासंचालनालयाचे पथक खाणीला भेट देते. परंतु, २९ जुलैच्या अपघातानंतर या पथकाने खाणीला भेट दिल्याचे अद्यापतरी जाहीर झालेले नाही, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कळणे परिसरातील समृद्ध जैवविविधता, खाणीला लागून असलेले शासकीय राखीव वन, पट्टेरी वाघासह असंख्य वन्य प्राण्यांचा संचार, स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींचा विरोध लक्षात घेता राज्य सरकारने या खाणीवर कायमस्वरुपी बंदी आणावी व पुढील नुकसान टाळावे. २९ जुलैच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी. नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणीही श्री. लळीत यांनी केली आहे.

You cannot copy content of this page