टोलच्या निविदेवर वैभव नाईकांचा डोळा – आमदार निलेश राणे

कुडाळ : टोलच्या निविदेवर वैभव नाईक यांचा डोळा आहे, असा गंभीर आरोप करत आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आमदार निलेश राणे आज विविध प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी कुडाळ न्यायालयात हजर होते. न्यायालयीन कामकाजानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टोलच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला.
ओबीसी आंदोलन, संविधान बचाव आंदोलन आणि मालवण नगरपंचायत स्टिंग ऑपरेशन या प्रकरणांमधील खटल्यांसाठी आमदार निलेश राणे आज कुडाळ न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
माजी आमदार वैभव नाईक यांनी नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी जिल्ह्याला टोलची भेट दिली, अशी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना निलेश राणे म्हणाले, टोलचे बांधकाम गडकरी येण्याआधीच पूर्ण झालेले आहे. हे काम होऊन दीड-दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. राजापूर आणि चिपळूणमध्येही अशाच प्रकारे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती न पाहता केलेली ही टीका दिशाभूल करणारी आहे.
येत्या २४ तारखेला टोलसंदर्भात निविदा निघणार आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता यावर भाष्य करताना निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. या निविदेवरच वैभव नाईक यांचा डोळा असावा. त्यांची काम करण्याची जुनी स्टाईल ठरलेली आहे. आधी आंदोलन करायचे, त्यानंतर ठेकेदाराला धमकी द्यायची आणि पत्रकार परिषद घ्यायची. कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर गडबडला की वैभव नाईक किंवा त्यांची माणसे त्याला फोन करतात. उद्या जर टोल हवा अस वैभव नाईक स्वतः कॉन्ट्रॅक्टरला भेटून तस सांगतील मग आश्चर्य वाटून घेऊ नका,असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page