विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश..
सावंतवाडी : शहरातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला.
नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विषय सूचीमधील १९ प्रमुख मुद्द्यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने नगरपरिषदेचे आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय पारदर्शकता यांची तपासणी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या समाजोपयोगी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी प्रशासनाला आश्वस्त केले व योग्य मार्गदर्शन केले.
बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामांचा दर्जा तपासला. त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील यंत्रणेची पाहणी केली. तसेच शहरात सुरू असलेल्या इतर विकास कामांच्या ठिकाणी जाऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ही सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे कडक निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रशासकीय सुधारणा आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला नगरपरिषदेचे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
