विश्वासात घेऊनच अंडरपासचा निर्णय होणार: कोकण रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन
*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील साकेडी रेल्वे फाटकाच्या दुतर्फा पर्यायी रस्त्याचे काम सुरू असल्याची बाब निदर्शनास येताच सरपंच व ग्रामस्थांनी पर्यायी जोड रस्ता नको रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अंडरपासच द्या. अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे सहाय्यक अभियंता पवन जोशी यांच्याकडे केली. यावेळी श्री. जोशी यांनी साकेडी रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अंडरपासला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याचा सर्वे करण्यात आला आहे. व त्या सर्वेनुसार अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येईल. व निधी उपलब्धतेनुसार याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अंडरपास न करता जोड रस्ता करण्यास विरोध दर्शवला. जोड रस्ता झाला तरी हरकत नाही मात्र रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी अंडरपास चे काम मार्गी लावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. या पूर्वीदेखील कोकण रेल्वेच्या कार्यालयाकडे यासंदर्भातील मागणी करण्यात आली आहे. साकेडी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजुला साकेडी तील अनेक वाड्यांचा समावेश आहे. यात रेल्वेच्या पलीकडील बाजूच्या वाड्यांचा संपर्क हा ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, रेशन दुकान, गावातील नळ योजना या अनुषंगाने व अन्य कामांसंदर्भात वारंवार येत असतो. रेल्वे फटकाच्या ठिकाणी जोड रस्ता केल्यास ग्रामस्थांना वळसा घालून जावे लागणार आहे. व यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागणार आहे. रेल्वे फाटकातून जात असलेला रस्ता हा ग्रामीण मार्ग असून तो पुढे इतर जिल्हा मार्गाला जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे ग्रामस्थांची मागणी डावलून जर या ठिकाणी अंडरपास न करता फक्त जोड रस्त्याचा पर्याय ठेवण्यात आला तर त्याला ग्रामस्थांमधून तीव्र विरोध केला जाईल असा इशारा देखील या शिष्टमंडळाला कडून श्री. जोशी यांना देण्यात आला. या चर्चेअंती श्री. जोशी यांनी साकेडी रेल्वे फाटकाजवळ अंडरपास संदर्भात सर्वे करण्यात आला आहे. ग्रामस्थांचा विरोध असल्यास जोड रस्त्याचे काम करण्यात येणार नाही. मात्र जोड रस्ता केला तरी ग्रामस्थाच्या मागणीनुसार अंडरपास साठी पाठपुरावा करण्यात येईल. अशी ग्वाही श्री. जोशी यांनी दिली. तसेच अंडरपास करत असताना या रेल्वे फाटका मधून जात असलेला ग्रामीण मार्ग वळविण्या करिता ग्रामपंचायत सोबत चर्चा करण्यात येईल. व अंडरपास मधून वळण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन श्री. जोशी यांनी दिले. त्यामुळे जरी जोड रस्त्या संदर्भात काम हाती घेण्यात आले असले तरी अंडरपास करण्यावर आपल्या मागणीनुसार प्राधान्य राहील अशी ग्वाही देखील श्री जोशी यांनी दिली. यावेळी सरपंच रीना राणे, माजी सभापती संजय शिरसाट, माजी सरपंच सुरेश साटम, माजी उपसरपंच पांडू वर्दम,भाजपा कार्यकर्ते राजू सदवडेकर उपस्थित होते.
