सिंधुदुर्गातील गाड्यांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता द्या

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षकांना निर्देश : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी वेधले लक्ष

*⚡बांदा दि.०१-:* महाराष्ट्र – गोवा सीमेवरील चेकपोस्टवर गोव्यातील पोलीसांकडून केल्या जाणार्‍या कडक तपासणी बाबत भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्गातील गाड्यांना गोव्यात प्रवेश करताना तपासणीबाबत शिथिलता देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षकांना सिंधुदुर्गातील गाड्यांना शिथिलता देण्याचे निर्देश दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत व युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी गोव्यात रोजगारासाठी जाणार्‍या नोकरदारांची व्यथा मांडली. पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा व आरोंदा चेकपोस्टवररुन गोव्यात जाणार्‍या गाड्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याने नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. पेडणे तालुक्यातील बहुतांश गावे बांदा बाजारपेठेशी संलग्न असल्याने बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. गाळेल येथील दरडीत मृत झालेला युवक हा तपासणी नाक्यावरील कडक अंमलबजावणीचा बळी होता याकडेही लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षक यांना सिंधुदुर्गातील गाड्यांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता द्या असे आदेश दिले. सदर बाब हायकोर्टात प्रलंबित आहे. गाळेल येथील घडलेल्या दुर्घटनेचा पंचनामा हायकोर्टात सादर करुन कोर्टाच्या ही बाब लक्षात आणून देण्याचे आश्वासन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत गोवा शासन कायम सकारात्मक आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस, तालुका उपाध्यक्ष संदिप बांदेकर, सरचिटणीस मधुकर देसाई, कार्यकारिणी सदस्य विनेश गवस, साई धारगळकर, शहर अध्यक्ष साई सावंत आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल युवा मोर्चाने आभार मानले.

You cannot copy content of this page