कणकवली 24 जुलै (प्रतिनिधी)- प्रख्यात विद्रोही कवी, ज्येष्ठ समीक्षक, कला अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कविवर्य तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सतीश काळसेकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध साहित्यिक, पत्रकारांनी श्रद्धांजली वाहीली आहे. मराठी साहित्यातील प्रतिभावान स्वयंतारा हरपल्याची खंत त्यांचे समवयस्क तथा ‘लिटिल मॅगझीन’ चळवळीतील त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विनायक मिठबांवकर यांनी व्यक्त केली. रत्नसिंधूच्या मातीवर अंत:करणपूर्वक प्रेम करणाऱ्या, नव्या साहित्यिकांना सतत मार्गदर्शन करणाऱ्या काळसेकर यांनी काल परवापर्यंत इथल्या साहित्य चळवळीच्या कार्यक्रमांना प्रेमपूर्वक हजेरी लावली. त्यांचे साहित्यकार्य एवढे मोठे आहे की, पुढच्या पिढीला काळसेकर यांचे कधीच विस्मरण होणार नाही, अशा शब्दांत सृजन प्रकाशन मुंबईचे संपादक विजय जाधव, ‘माझं अस्तित्व’चे प्रदीप नाईक, कवी प्रकाश जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली .
कवी सतीश काळसेकर यांना बौद्ध साहित्यिकांतर्फे श्रद्धांजली
