जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची आयुक्त स्तरावर चौकशी व्हावी:परशुराम उपरकर
कणकवली 16 जुलै (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून आतासिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत शालेय विभाग विभागाच्यावतीने वॉटर प्यूरीफायर २ कोटी, फायबर रॅक २ कोटी व पाच प्रयोग शाळांसाठी साहित्य खरेदीसाठी ८० लाख असे ४ कोटी ८० लाखांची खरेदी केली आहे. या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून यासंदर्भात आयुक्त स्तरावर शिक्षण विभागाची चौकशी होऊन भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित व्हावे या मागणीसाठी मनसे आयुक्तांकडे व मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथे ऑनलाइन पद्धतीने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वॉटर प्यूरीफायर, फायबर रॅक व प्रयोगशाळेतील साहित्य खरेदीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने छोट्या जाहिराती काढून मॅनेज पुरवठादार घेतले आहेत. कालच्या सर्वसाधारण सभेत ज्या शिवसेनेच्या विरोधी सदस्यांनी आवाज उठवला तो यापूर्वीच उठवण्याची गरज होती. यापूर्वी मनसेने २२ मार्चला सदर खरेदीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यावेळीच शिवसेना सदस्यांनी बैठकांमध्ये बाजू मांडण्याची गरज होती. अनेक शाळांमध्ये हे साहित्य पुरविण्यात आलेले नाही. शालेय समितीमध्ये सदर प्रस्तावावर चर्चा होऊन थेट सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला,हे चुकीचा आहे. यापूर्वी वित्त समिती व स्टँडिंग समितीमध्ये हा प्रस्ताव येण्याची गरज होती. दहा वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने वॉटर प्यूरीफायर खरेदी करण्यात आली होती असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला. आता या खरेदीबाबत चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याची कनिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात येणार आहे,ही केवळ धूळफेक आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम जिल्हा परिषद करत आहे. घाईगडबडीने निविदा प्रक्रिया करत एका महिन्यात खरेदी मॅनेज पुरवठादारांकडून करण्यात आली आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी यापूर्वी आवाज उठवण्याची गरज होती. काही वर्षांपूर्वी प्रोटीन पावडर ८० लाखांची खरेदी करून भ्रष्टाचार केला होता.त्या विरोधात मी सभागृहात आवाज उठवल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व काही अधिकारी निलंबित झाले होते. त्यामुळे सदर प्रकरण मनसेने गांभीर्याने घेतले असून याची तक्रार वरिष्ठ स्तरावर करून चौकशी लावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.
