पर्यटन व्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडून औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती

व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आवाहन

*💫मालवण दि.२८-:* कोविड १९ महामारीचा पर्यटन व्यवसायातील आदरातिथ्य क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे या क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला असून हॉटेल व्यवसायात किमान मूलभूत दर्जा पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक दराने कर/शुल्क आकारण्यात येणार आहे, या निर्णयाचा जिल्ह्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे. आदरातिथ्य क्षेत्र पर्यटन व्यवसायातील मुख्य सेवा उद्योग आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे हा व्यवसाय परकीय चलन मिळवून देण्यास परिणामकारक साधन आहे. कोविड-१९ चा या क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने वीज दर, वीज शुल्क, मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक आणि अकृषी कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हॉटेल व्यवसायात किमान मूलभूत दर्जा पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक दराने कर /शुल्क आकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, पर्यटन संचालनालय यांचेकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची स्थळ पाहणी केली जाईल. किमान मूलभूत दर्जा पूर्ण होत असल्यास त्यांना त्वरित नोदणी प्रमाणपत्र दिले जाईल. आदरातिथ्य क्षेत्रधारकांची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज आणि त्या सोबतचे कागदपत्र करणे आवश्यक आहे. हे अर्ज करण्याचीची कार्यपद्धती ऑनलाइन आहे. ऑनलाइन अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर करता येईल किंवा https://docs.google.com/forms/d/102pqZqSVF_LkQWFYTCcIlIqGopWyf-MHiGjGRrJfFFw/ लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. पर्यटन व्यवसायात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आदरातिथ्य सेवेला उद्योगाचा दर्जा दिल्याने पर्यटन संचालनालय यांच्याकडे नोंदणी करणाऱ्या उद्योजकांना निश्चितच कोविड-१९ च्या परिस्थितीत पुनर्जीवित होण्यास मदत होईल. त्याचा फायदा पर्यटन उद्योगाला होणार असून या विषयी काही अडचण उद्भवल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघामार्फत सहकार्य करण्यात येईल. तरी याचा लाभ जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायीकांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात येत आहे, असेही बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page