राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य दूरगामी परिणाम करणारे

सामाजिक सुधारणांसोबतच स्वतंत्र भारताचा भक्कम पाया रचला-:श्रीराम पचिंद्रे

*💫ओरोस दि.२५-:* राजर्षी शाहू महाराज हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. समाज सुधाराणांचा वसा पुढे नेतानाच त्यांनी स्वतंत्र भारताचा भक्कम पाय निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य म्हणजे दूरगामी परिणाम करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व इतिहास अभ्यासक श्रीराम पचिंद्रे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू माहाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक सुधारणा याविषयावरील व्याख्यानावेळी ते बोलत होते. ब्रिटिश सत्तेचा वापर संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी करणारे राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून श्री. पचिंद्रे म्हणाले, राज्याभिषेकानंतर शाहू महाराजांनी सर्व प्रथम आपल्या संपूर्ण संस्थांनचा दौरा करून प्रजा कशी जगते आहे याचे बारकाईने अवलोकन केले. प्रजाही अज्ञान, दारिद्य आणि अंधश्रद्धेमध्ये पिचली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या परिस्थितीतून प्रजेला बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य सुरु केले. प्रथम त्यांनी शेती सुधारणेकडे लक्ष दिले. शेती सुधारली तर आर्थिक परिस्थिती सुधारून प्रजा सुखी होईल हा त्यामगील उद्देश होता. त्यासाठी त्यांनी ‘फड’ पद्धतीच्या शेतीची सुरुवात केली. फड पद्धतीची शेती म्हणजे थोडक्यात सामुहिक शेती. या प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सरकारातून शेतकऱ्यांना बियाणे पुरवली. त्याचबरोबर ऊस, तंबाखू, मिरची अशी नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी प्रयत्न केले. ऊसापासून निर्माण होणाऱ्या गुळाला गुजरातमध्ये मोठी बाजारपेठ होती. ती मिळवून देण्यासाठी संस्थानामध्ये रेल्वेची सुरुवात केली. या रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूरचा गूळ गुजरातपर्यंत पाठवला आणि व्यापारास चालना दिली. याबरोबरच शाहू महाराजांनी समाजातील विषमता संपवण्याचेही कार्य केले. शिक्षण दिल्याशिवाय विषमता दूर होणार नाही हे जाणून त्यांनी संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण संक्तीचे केले. त्यासाठी सरकारातील 13 टक्के निधी राखीव ठेवला. शिक्षणावर स्वतंत्र खर्च करणारे कोल्हापूर हे पहिले संस्थान होते. त्यामधून इतर समाजातील हुशार व होतकरू मंडळी पुढे आली आणि संस्थानचा विकास होण्यास मदत मिळाली. मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी वसतीगृहांची निर्मिती केली. सुरुवातीस एकाच वसतीगृहात सर्व जाती-धर्माची मुले एकत्र राहत होती. पण, त्यांच्यामध्ये विषमतेची भावना घट्ट होती. ती कमी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जाती-धर्माची वसतीगृह सुरू केली. त्यामुळे मुले शिक्षित होऊन विषमता कमी होण्यास मदत झाली. तसेच सामाजिक सुधारणांची चळवळही पुढे सुरू राहिली. शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा यामधूनच सामाजिक सुधारणेचा मार्ग जातो हे त्यांनी जाणले आणि म्हणूनच त्यांनी संस्थानातील कलाकार, खेळाडू यांनाही मदत केली. उद्योगास चालना देण्यासाठी शिवाजी उद्यम नगरची स्थापना केली. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे जनक म्हणूनही शाहू महाराजांची ओळख आहे. ज्याकाळी मुले व मुली एकत्र शिक्षण घेणे हा विचारही समाजाला शिवत नव्हता त्याकाळी शाहू महाराजांनी विद्यापीठ हायस्कूल संस्थेची स्थापना करून तिथे मुले – मुलींच्या एकत्र शिक्षणाची सुरुवात केली. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी स्वागत व प्रस्तावना केली. माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page