देवळी समाजाचा १० मे रोजी जिल्हा मेळावा…

वधू-वर सूचक मेळाव्याचेही आयोजन :गुणवंत आणि मान्यवरांचा होणार सत्कार..

⚡कुडाळ ता.०३-: देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने देवळी समाजाचा भव्य जिल्हा मेळावा आणि वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १० मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यानिमित्ताने ज्ञातीतील गुणवंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती देवळी समाज हितवर्धक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी दिली. कुडाळ एमआयडीसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन यांनी यांनी या मेळाव्याची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी मंडळाचे सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार रमेश नरसुले, तसेच सदस्य ऍड अनघा तेंडुलकर, अरविंद तेंडुलकर, भास्कर केरवडेकर, मयूर आरोलकर, नागेश ओरोसकर, अनिल तोंडवळकर, बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.
राजन नाईक म्हणाले, आज देवळी समाज जो विघटित अवस्थेत आहे. त्याला एकत्र करून गठित करणे काळाची गरज आहे. समाज बांधवास प्रबोधन करणे, उभारी देणे ही कर्तव्ये जातीच्या हितासाठी केलीच पाहिजेत. जातीच्या चांगल्या कृतीचा अभिमान इतरांना मार्गदर्शक ठरला पाहिजे. कुशल, हुशार तरुणास त्यांचे कलाविश्व विकसित करण्यास सर्वतोपरी साथ करणे, अनिष्ट रूढी परंपराचे समूळ उच्चाटन करणे, त्यासाठीच आम्ही निष्ठापूर्वक आणि देवळी जातीच्या स्वाभिमानाने त्या जातीची प्रगती करण्यास वचनबद्ध झालो आहोत. देवळी या इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या जाती, जागृती निर्माण करून विविध सवलती सुविधांबाबत डोळस मार्गदर्शन करणे आणि त्या मिळवून देणे म्हणूनच आम्ही जातीच्या उल्लेखाने मंडळ तयार केले आहे.
राजन नाईक यांच्याच अध्यक्षेतेखाली हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून देवळी समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गेली काही वर्ष देवळी समाजाचा हा मेळावा झालेला नाही. त्यामुळे कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने कुडाळ येथे हा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. या मेळाव्यात देवळी समाजाच्या दशावतारी नाट्य मंडळांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच देवळी समाजातील कलाकार, क्रिकेट संघ, खेळाडू, बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीत निवडून आलेले समाजातील लोकप्रतिनिधी, समाजातील डॉक्टर्स यांचा विशेष सत्कार या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
तसेच तुळस येथील विजय तुळसकर या देवळी समाजातील हुशार विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक या निमित्ताने करणार असल्याचे राजन नाईक यांनी सांगितले. तसेच वधू – वर सूचक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या तमाम देवळी समाज बंधू – भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page