⚡मालवण ता.०३-:
पर्यटन गाव असलेल्या तारकर्लीमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना तारकर्ली रांजेश्वर मंदिर परिसरात पर्यटकांची गाडी थेट एका हॉटेलमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत हॉटेल मधील वेटर जखमी झाला असून हॉटेल मधील साहित्याचे नुकसान झाले आहे.
तारकर्ली एमटीडीसी निवास केंद्रासमोर रांजेश्वर मंदिरानजिक रस्त्यालगत स्वप्नील मिटकर यांचे सिंधुरत्न नावाचे हॉटेल आहे. या परिसरात आज नेहमीप्रमाणे पर्यटकांची वर्दळ सुरु असतानाच दुपारी रस्त्यावरून जाणारी पर्यटकांची एमएच ०७ – क्यू – ५३५२ क्रमांकाची टाटा व्हिक्टा गाडी रस्ता ओलांडून थेट सिंधुरत्न हॉटेल मध्ये घुसली. गाडी थेट हॉटेल मध्ये घुसल्याने हॉटेल मधील लोकांची तारांबळ उडाली. या घटनेत हॉटेल मधील टेबल खुर्च्या व इतर साहित्याचे नुकसान झाले. तर तिथेच काम करत असलेला रवींद्र श्रीधर आचरेकर हा वेटर या घटनेत जखमी असून त्याच्या हातापायाला मार बसला आहे. या घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर पर्यटकांच्या गाडीत सात ते आठ जण प्रवासी पर्यटक होते. तसेच या गाडीवर सीआरपीएफ, पोलीस अशा नावांचे स्टिकर लावलेले होते. सध्या मालवण तारकर्ली, देवबाग परिसरात येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या वाहनांवर पोलीस, आर्मी, कस्टम, नेव्ही, सीआरपीएफ अशा नावांचे स्टिकर लावलेले दिसून येतात त्यामुळे अशा वाहनांची पोलिसांनी चौकशी व तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
