सिनेनाट्य अभिनेते लवराज कांबळी यांनी दिली माहिती
*💫मालवण दि.०६-:* अलीकडच्या काही वर्षात मालवणी नाटकांचा ब्रँड काहीसा मागे पडला आहे. रंगभूमीवरील मालवणी ब्रँड जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्व. गीतांजली कांबळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालवणी भाषेचा ठसा असलेले गीतांजली प्रॉडक्शनचे ‘माझ्या देवाक काळजी रे’ हे मालवणी नाटक रंगभूमीवर येत असल्याची माहिती सिनेनाट्य अभिनेते लवराज कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण येथील हॉटेल कोणार्क येथे आयोजित पत्रकार परिषद परिषदेत अभिनेते लवराज कांबळी हे बोलत होते. श्री. कांबळी म्हणाले, स्व. मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून नाट्य क्षेत्रात मालवणी भाषेचा बँड निर्माण केला. मात्र अलीकडच्या काळात जास्त मालवणी नाटके रंगभूमीवर न आल्याने आपण व स्व. गीतांजली कांबळी यांनी मालवणी नाटकांची निर्मिती करून मालवणी भाषेचा ब्रँड जपण्याचा प्रयत्न केला आहे. वस्त्रहरण मधील तात्या म्हणून अजरामर भूमिका बजावणाऱ्या मच्छीन्द्र कांबळी यांच्या नंतर आपण गोप्या म्हणून मालवणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपली पत्नी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मालवणी भाषेची जाण असलेली अभिनेत्री हरपली, त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘माझ्या देवाक काळजी रे’ या नाटकाची निर्मिती आपण गीतांजली प्रॉडक्शनतर्फे करत आहोत. या नाटकाचे लेखन विराज कांबळी तर दिग्दर्शन राजू रेवंडकर यांनी केले आहे. नाटकात आपण व संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘माझ्या देवाक काळजी रे’ हे मालवणी नाटक कौटुंबिक पद्धतीचे असून या नाटकात आठ कलाकारांचा समावेश आहे, असेही कांबळी म्हणाले. सध्या कोरोना महामारी कालावधीत नाटकांचे प्रयोग होत नसल्याने नाट्यचळवळ थांबली होती. कोरोना महामारीचा मोठा फटका नाट्यचळवळीस बसला आहे. मात्र येत्या काही महिन्यात नाटके रंगभूमीवर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच मराठी नाटकांच्या बरोबरीनेच नाट्यरसिकांना दर्जेदार मालवणी नाटक देण्यासाठी ‘माझ्या देवाक काळजी रे’ या नाटकाची निर्मिती करत आहोत. येत्या २० डिसेंबरला या नाटकाचे मुंबई येथे वाचन होणार आहे, असेही कांबळी यांनी सांगितले.