मुख्याधिकाऱ्यांनी केले पोलिसांना पाचारण;५ वाजता कामाच्या ठिकाणी चर्चा करण्याच्या निर्णयानंतर थांबला वाद
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील गटार खोदाईचे काम पूर्ण न झाल्याने आज उपनगरध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना जाब विचारण्यासाठी गेले असता शाब्दिक बाचाबाची होऊन वादाची ठिणगी पडली. यावेळी नगरसेवकांनी दमदाटी करून धमकी दिल्याचा आरोप मुख्याधिकारी जिरगे यांनी करीत पोलिसांना पाचारण केले. यामुळे वातावरण तंग बनले. यावेळी पोलीस दाखल झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता गटार खोदाई कामाच्या संबंधित ठेकेदाराशी कामाच्या ठिकाणी नेऊन एकत्रित चर्चा करावी असे सांगितले त्यानंतर या वादावर तात्पुरता पडदा पडला. मुख्याधिकऱ्यांचीच भाषा चुकीची असून त्यांनी प्रशासकीय ताकदीची भीती आम्हाला दाखवू नये, आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी भांडत आहोत, आमच्यावर खुशाल गुन्हा दाखल करावा असा इशारा यावेळी उपनगरध्यक्ष राजन वराडकर यांनी दिला. पावसाळा सुरू झाला तरी मालवण शहरातील गटार खोदाईची कामे अपूर्ण असल्याने आक्रमक बनलेल्या नगरसेवकांनी आज मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत त्यांना जाब विचारला. उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे, पंकज सादये, आप्पा लुडबे, ममता वराडकर, पूजा सरकारे हे नगरसेवक चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चेदरम्यान नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वाद निर्माण झाला. गटाराचे पाणी वाहून नेणाऱ्या काही व्हाळ्यांची सफाई झाली नसून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. मात्र या मागणीस मुख्याधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ही मागणी कळीचा मुद्दा ठरली. यामुळे आणखी बाचाबाची झाल्याने मुख्याधिकारी यांनी पोलीस बंदोबस्त मागविला. यामुळे नगरपालिकेत वातावरण तंग बनले होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी आपल्याशी बोलताना धमकीची भाषा वापरली, अशी भाषा आपण खपवून घेणार नाही असे सांगितले. यावेळी राजन वराडकर म्हणाले, पावसाळा सुरू झाला तरी गटार सफाई नाही, बाजारपेठेत पाणी साचत आहे. प्रशासनाचे नियोजन चुकतेय म्हणूनच आम्हाला बोलावे लागतेय, मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला भीती दाखवू नये, काम कधी पूर्ण करणार हे सांगावे, मुख्याधिकारी या चर्चेला वेगळं वळण देत आहेत असेही वराडकर म्हणाले. यावेळी पोलिसांसमवेत झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता ठेकेदाराशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचीही भेट घेवून याबाबत लक्ष वेधत मुख्याधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत तक्रार मांडली.
