वायरी समुद्रकिनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले

कासवाला स्थानिक मच्छिमारांनी दिले जिवदान;वन विभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम च्या टीमने केले पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार

*💫मालवण दि.१२-:* मालवण वायरी समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खराब जाळ्यात अडकलेले ऑलिव्ह रिडले मादी जातीचे कासव वाहून आल्याचे स्थानिक मच्छीमारांना दिसून आले. स्थानिक मच्छीमारांनी कासवाची जाळ्यातून सुटका त्याला जीवदान दिल्यावर वन विभाग व कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम टीमच्या सहकार्यातून या कासवाला उपचारासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचाराअंती तोंडवळी समुद्रात सोडण्यात आले. वायरी समुद्र किनारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रवीण बांदकर, निलेश पराडकर, संजय जोशी या मच्छीमारांना खराब जाळ्यात अडकून वाहून आलेले ऑलिव्ह रिडले कासव दिसून आले. या कासवाचा पुढच्या बाजूचा उजवा पाय तुटलेला असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सागरी जीवरक्षक जगदीश तोडणकर, बाबा मोरजकर, दिलीप घारे यांना पाचारण केल्यानंतर त्यांनी या कासवाची जाळ्यातून सुखरूप सुटका करत त्याला जीवदान दिले. यानंतर जगदीश तोडणकर यांनी वन विभाग तसेच कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमला याची कल्पना दिल्यानंतर वन विभागाचे श्रीकृष्ण तारी, फकीर परीट व रेस्क्यू फोरमचे अनिल गावडे, आनंद बांबर्डेकर आदी त्याठिकाणी दाखल झाले. कासवाची पाहणी केल्यानंतर वन विभागाने कासवाला ताब्यात घेतले पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या कासवाला तोंडवळी येथील समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

You cannot copy content of this page