विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना, युवा रक्तदाता संघटनेची निवेदनातून मागणी*
*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोनाला रोखण्यासाठी सावंतवाडीच्या डॉ.अबिदा परब आणि मालवणचे डॉ.विवेक रेडकर यांनी आपल्या स्तरावर उपलब्ध संसाधनांचा वापर करत वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधून काढल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी निवेदनातून केली आहे. तळवणेकर व सूर्याजी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, कोरोना महामारीचे नवे पर्व चालू असताना सर्वच स्तरावर जनसामान्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना संक्रमणात कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधल्या जात आहेत. डॉ. अबिदा परब (मकानदार), डॉ.विवेक रेडकर यांनी कमीत कमी खर्चात, सर्वसामान्य लोकांना परवडणारी उपचार पद्धती जगासमोर मांडून कोरोना महामारीत थोडा दिलासा दिला आहे; मात्र प्रशासनाने या दोन्ही उपचार पद्धतींना रीतसर अधिकृत मान्यता द्यावी. गोव्यातील बऱ्याच रुग्णांना डॉ. अबिदा परब यांच्या ‘राईच्या तेलाच्या’ उपचाराचा फायदा झाला, त्याची नोंद गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली आहे. या दोन्ही उपचार पद्धतींचा विचार शासनाने करावा, तसेच तांत्रिक अडचणी दूर करून या उपचार पध्दतीना अधिकृत मान्यता द्यावी. अशी विनंती तळवणेकर सूर्याजी यांनी निवेदनातून केली आहे.
