ग्राम विलगीकरण कक्षासाठी शिक्षकांना ड्युट्या लावण्याची गरजच काय?

परशुराम उपरकर यांचा सवाल;दाखल रुग्ण रात्रीच्या वेळी कक्षात थांबतात का?

*💫कणकवली दि.०९-:* कोरोना पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेल्यांना गावातच ग्राम विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. या पाठोपाठच कोरोणा मुक्त गाव स्पर्धाही जाहीर होताच आणि 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची मुभा मिळताच आज अनेक गावांमध्ये ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन झाले. मात्र या कक्षांमध्ये आज किती जण दाखल आहेत? जे दाखल आहेत ते रात्रीच्या वेळी थांबतात का? शासनाच्या धोरणात प्रमाणे त्या ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह, गरम पाण्यापासूनची व्यवस्था आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्यातच या ग्राम विलगीकरण कक्षासाठी शिक्षकांना ड्युट्या लावण्यात आल्या. मुळात अशा ड्युट्या लावण्याची गरजच काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. तसे पाहायला गेल्यास गावागावांमध्ये दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्दी, खोकला, तापसरीचे, अंगमोडीचे रुग्ण आढळत असतात. पूर्वी पावसाळा आला की डॉक्टरांना सुगीचे दिवस आले असेही म्हटले जात असे. याहीवर्षी अशाप्रकारचे रुग्ण आहेत. गावागावात अशांची रॅपिड टेस्ट केली असता काहीवेळा कोणतेही लक्षण नसताना ते पॉझिटिव येऊ शकतात. अशांची प्रसंगी rt-pcr टेस्ट करणे आवश्यक आहे, तसेच संबंधितांना कोणतीही लक्षणे नसल्यास त्यांना गृह विलगीकरण यात ठेवून पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा टेस्ट करणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या कोरोना मुक्त गाव स्पर्धे सहभागी होण्याच्या दृष्टीने ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले जात आहेत. मात्र असे कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर किंवा जिल्हा परिषद मतदार संघ पातळीवर ग्रामपंचायतीने एकत्रित येऊन योग्य ठिकाणी केले व त्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत स्वतंत्र व्यवस्थापक नेमून काळजी घेतली तर तेही या निकषात बसू शकतील. मात्र तसे न करता प्रत्येक गावांमध्ये असे विलगीकरण कक्ष स्थापन केले जात आहेत. शासन धोरणानुसार या विलगीकरण कक्षांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह लाईटची व्यवस्था गरम पाणी आदीं व्यवस्था होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नाही. केवळ 15 व्या वित्त आयोगातून पैसे खर्च घालून हे कक्ष स्थापन होत आहेत. या ठिकाणी कोणतीही आवश्यकता नसताना शिक्षकांना ड्युटी लावण्यात येत आहेत. वास्तविक या कक्षाच्या 100 मीटर आवारात कुणालाही प्रवेश नाही, असे असेल तर त्या शिक्षकांनी, विशेषता महिला शिक्षकांनी थांबावयाचे कोठे? आज जवळपासच्या घरातील लोक त्यांना घरात घेत नाहीत किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी ही दुसऱ्याच्या घरी जाऊन थांबणे उचित नाही. मग त्यांनी रस्त्यावर थांबायचे का? या शिक्षकांनी बाहेर थांबून नेमके काम काय करायचे आहे. ग्राम विलगीकरण कक्षातून फोन आला तर त्यांनी ग्रामपंचायतीला कळवावयाचे आहे. मग हे काम ते घराजवळनही करू शकतात किंवा ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्षातून थेट ही फोन जाऊ शकतात. प्रसंग वाटल्यास ग्रामपंचायतीतून एवढी रक्कम खर्च घातली जात असेल तर महिन्याभरासाठी एखादा कर्मचारीही नियुक्त करता येऊ शकतो. मात्र तसे न करता शिक्षकांना ड्युट्या लावणे योग्य नाही. शिक्षकांना अशा ड्युट्या लावून बाहेर थांबून ठेवण्या मागचा उद्देश ही समजत नाही? आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे या शिक्षकांनी छत्री घेऊन पावसात उभे राहायचे आहे का? त्यातच 14 तारीख पासून शाळा सुरू होताच ऑनलाइन शिक्षणही सुरू होईल मग या शिक्षकांनी मुलांना ऑनलाइन अभ्यास घ्यायचा की गृह विलगीकरण कक्षाची राखण करायची? याबाबत जीपच्यां मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ सूचना देउन उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावे लागेल असा इशारा श्री. उपरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page