Headlines

इन्सुली क्षेत्रफळवाडीत ओंकार हत्तीचा धुडगूस; वाहनांसह घरांचे नुकसान

दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन आणि घराच्या कंपाउंडचे गेट तोडले; भाताच्या उडव्यांचीही नासधूस

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेल्या ओंकार हत्तीने काल रात्री इन्सुली येथील क्षेत्रफळवाडी परिसरात धुडगूस घालत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हत्तीने दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच घराच्या कंपाउंडचे गेट तोडून टाकले. याशिवाय भाताच्या उडव्यांचीही नासधूस केली. हत्तीचा वाढता आक्रमकपणा पाहता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सीताराम तळवडेकर यांच्या दोन दुचाकींचे नुकसान झाले. यशवंत चंद्रकांत परब यांच्या एका दुचाकीसह चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले. सुनील जावडेकर यांच्या घराच्या कंपाउंडचे गेट हत्तीने तोडले, तर रविंद्र वसंत राणे यांच्या भाताच्या उडव्यांची नासधूस केली.
विशेष म्हणजे, ओंकार हत्ती आता केवळ शेती-बागायतींचे नुकसान न करता थेट वस्तीमध्ये आणि घरांच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्तीचा हा आक्रमकपणा असाच सुरू राहिल्यास लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या ओंकार हत्तीचा वावर इन्सुली, वाफोली, विलवडे, कोनशी, ओटवणे आणि भालावल परिसरात असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
हत्ती थेट मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने आता केवळ नुकसानीचा पंचनामा करून चालणार नाही, तर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page