‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रा’तून नागरिकांना मिळणार आरोग्य सेवा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी..
⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही यासाठी प्रयत्न केले. नगराध्यक्षांच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह नगरपालिका दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
येत्या चार दिवसांत दवाखान्यासाठी डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येणार असून, येत्या सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे नगरपालिका दवाखान्याची आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सावंतवाडी येथे सध्या कार्यरत असलेले ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ नगरपालिका दवाखान्याच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नियमित आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, दवाखाना बंद होण्याची निर्माण झालेली शक्यता दूर झाली आहे. नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी नगरपालिका दवाखाना नियमित सुरू राहावा, यासाठी विशेष पाठपुरावा केला.
या पाहणीवेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, देवा टेमकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

