⚡बांदा ता.३०-: मडूरा-डिगवाडी येथील प्रगतिशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वालावलकर यांची ‘राष्ट्रीय आदर्श कृषी रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. पंढरपूर येथील विचार मंथन सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रकाश वालावलकर गेल्या सुमारे ३६ वर्षांपासून शेती व बागायती व्यवसायात कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रासोबतच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. जय बजरंगबली सांस्कृतिक कला, क्रीडा व व्यायाम मंडळ, रोणापाल-मडूरा तिठा या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच जय हनुमान देवस्थान समितीचे सहसचिव, व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडूराचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि मडूरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
याशिवाय श्री देवी माऊली शेतकरी संघ, मडूरा तसेच सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातूनही ते शेतकरी व बागायतदारांच्या विविध प्रश्नांशी जोडलेले आहेत. शेती व बागायती क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची तसेच सामाजिक योगदानाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याचे संस्थेने कळविले आहे.
७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रकाश वालावलकर यांच्या निवडीबद्दल मडूरा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो:-
पासपोर्ट.

