संशयित सराईत महिला चोरटी जालन्यातून जेरबंद; पोलिसांची संयुक्त कारवाई..
⚡सावंतवाडी ता.३०-: बसस्थानक परिसरात एका प्रवाशाचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्या महिला आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जालना जिल्ह्यातील मंठा येथून सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले. संगीता सुभाष जाधव (वय ३५ वर्ष, रा. झोपडपट्टी, मंठा, जिल्हा जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी बसस्टँड परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तपासले. या तपासात हा गुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार महिला संगीता जाधव हिनेच केल्याचे स्पष्ट झाले.
गुन्ह्याचा सुगावा लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने जालन्यातील मंठा परिसरात बनाव रचून आरोपी महिलेस शिताफीने ताब्यात घेतले. तिची सखोल चौकशी केली असता तिने सावंतवाडी बसस्टँड येथील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी महिलेला पुढील कारवाईसाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तिच्याकडून चोरी गेलेला सर्व ऐवज हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पार पडली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार जॅकसन घोन्सालविस, अंमलदार अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार शिंदे आणि महिला अंमलदार गावकर यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

