Headlines

ई-कचरा जमा करण्याचे आडवली मालडी ग्रामपंचायतीचे आवाहन

मालवण : (प्रतिनिधी)

वाढत्या इलेक्ट्रोनिक उपकरणांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील धातू व रसायनांमुळे माती, पाणी तसेच हवेचे प्रदूषण होऊन मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आडवली मालडी ग्रामपंचायतीने ई-कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

ग्रा.पं.च्यावतीने नागरिकांना घरातील जुने मोबाईल, संगणक, मॉनिटर, की-बोर्ड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायर, चार्जर, बॅटरी तसेच अन्य ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकता ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कचऱ्यातील घातक धातू व रसायनांमुळे मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते. तसेच विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता असते. ई-कचरा जाळल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यास हानिकारक वायू वातावरणात मिसळून प्रदूषण वाढू शकते. त्यामुळे शिसे, पारा, कॅडमियम यांसारख्या घातक घटकांपासून होणारे आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी ई-कचऱ्याचे स्वतंत्र संकलन व योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. ई-कचरा हा ओला अथवा सुका कचऱ्यासोबत मिसळू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी आपला ई-कचरा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आणून जमा करावा, असे सांगण्यात आले आहे. ‘आज जबाबदारीने ई-कचरा जमा करा’ असा संदेश देत आडवली मालडी ग्रामपंचायतीने दिला आहे.

You cannot copy content of this page