सार्वजनिक रस्त्याची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी डॉ. जितेंद्र केरकर यांचे आमरण उपोषण….

*💫मालवण दि.०३-:* तारकर्ली येथे सार्वजनिक रस्त्याची तोडफोड केल्याप्रकरणी प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई न झाल्याबाबत तसेच कारवाईच्या तरतुदीविषयी माहिती न मिळाल्याबाबत तारकर्ली येथील डॉ. जितेंद्र केरकर यांनी आज मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी पंचायत समिती प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई होण्यासाठी ठोस माहिती न मिळाल्याने प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे डॉ. केरकर यांनी यावेळी सांगितले. तारकर्ली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सार्वजनिक रस्त्याची तोडफोड केल्या प्रकरणी संबंधितांवर शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे कारवाई व्हावी यासाठी डॉ. जितेंद्र केरकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तसेच कारवाईच्या तरतुदी बाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने डॉ. केरकर यांनी गुरुवारी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी अमित इब्राह्मपुरकर व विल्सन गिरकर यांनी उपोषणस्थळी डॉ. केरकर यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा केरकर उपस्थित होत्या. या उपोषण दरम्यान गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी डॉ. केरकर यांची भेट घेतली. मात्र रस्त्याच्या तोडफोडी प्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याबाबत सायंकाळ पर्यंत पं.स. प्रशासनाकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने डॉ. केरकर यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले होते. कारवाई बाबत माहिती न मिळाल्यास या गैर प्रकाराविरोधात न्यायालयीन लढाई लढू असा इशाराही डॉ. केरकर यांनी दिला. फोटो- सार्वजनिक रस्त्याच्या तोडफोड प्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या डॉ. जितेंद्र केरकर यांची मनसे पदाधिकारी अमित इब्रामपुरकर व विल्सन गिरकर यांनी भेट घेत चर्चा केली.

You cannot copy content of this page