Headlines

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवासी हैराण…

⚡सावंतवाडी ता.२४-: कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनस स्थानकाला २५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे. सावंतवाडी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पुरेशी निवारा शेड उपलब्ध नसल्यामुळे भरदुपारच्या कडक उन्हात आणि मुसळधार पावसात प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रवाशांकडून पूर्ण तिकिटाचे पैसे वसूल केले जात असतानाही अशा प्रकारची गैरसोय सहन करावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. दुपारच्या वेळी सावलीचा कोणताही आडोसा नसल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सावंतवाडी स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा मिळून एवढा काळ उलटला तरी प्लॅटफॉर्मवर साधी निवारा शेड उभारण्यात आलेली नाही. या अत्यावश्यक सुविधेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते ठोस पाठपुरावा कधी करणार, असा सवालही नागरिक विचारत आहेत. प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे मंत्रालय, रेल्वे सेवा, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावर टॅग करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लवकरात लवकर पूर्ण क्षमतेची निवारा शेड उभी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

You cannot copy content of this page