विशाल परब:काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे भूमिपूजन..
वेंगुर्ला, ता. १७-: तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. या उपक्रमामुळे मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “अध्यात्म हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. मंदिर हे केवळ पूजास्थळ नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि पुढील पिढ्यांना संस्कार देणाऱ्या मूल्यांचे केंद्र आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाला हातभार लावणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”
नूतन प्रवेशद्वार हे केवळ मंदिरात प्रवेश करण्याचे माध्यम न राहता गावच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अनेक पिढ्यांपासून जपलेल्या धार्मिक परंपरांमुळे सामाजिक एकोपा अधिक दृढ होत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
भूमिपूजन सोहळ्यास राजू रगजी, विलास रामचंद्र बागकर, अनिल बागकर, विठोबा बागकर, महेश बागकर, विलास बागकर, विजय बागकर, प्रसाद बागकर, प्रणय बागकर, राजा बागकर, राजाराम बागकर, शिवराम बागकर, पुरुषोत्तम दीक्षित, भगिरत बागकर, विश्वनाथ बागकर, पंकज नाईक, सुमेश बागकर, उल्हास बागकर, प्रशांत बागकर यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
नूतन प्रवेशद्वाराच्या उभारणीमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
