गणपती साना येथे स्वच्छता मोहीम:नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग..
⚡कणकवली ता.१७-: कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’ तसेच ‘सेवा अभियान-२०२६’ या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी गणपती साना येथे करण्यात आला. नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून अभियानाची सुरुवात झाली.
यावेळी गणपती साना परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी नागरिक, संस्था आणि सर्व स्तरांवरील नेतृत्वाने एकत्रितपणे सहभाग घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
‘स्वच्छता ही सेवा-२०२६’ हे अभियान गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयांतर्गत शहरी विकास विभाग आणि जलशक्ती मंत्रालयांतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान सुरू राहणार असून, २ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिवस’ निमित्त अभियानाची सांगता होणार आहे.
यावर्षीच्या अभियानाची संकल्पना ‘स्वच्छता में सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ अशी आहे. स्वच्छ व विकसित भारताच्या निर्मितीमध्ये प्रत्येक व्यक्तीची सामूहिक भूमिका व जबाबदारी अधोरेखित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
कणकवली शहरात या कालावधीत स्वच्छता, जनजागृती, पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर, विकसित शहर’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका मेघा सावंत तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
