जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर:सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ..
⚡कणकवली ता.१७-: कलमठ ग्रामपंचायतीने गावातील ई-कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीच्या श्री देव काशिकलेश्वर सभागृहात डॉ. बासूर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. बासूर म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध योजना व अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांना सोबत घेऊन या योजनांचा प्रभावीपणे लाभ घेतला पाहिजे. कलमठ ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून, ई-कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा.
शासनाच्या विविध अभियानांमध्ये कलमठ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहभागातून सक्रियपणे काम करून उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी कलमठ ग्रामपंचायतीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची शासनाने दखल घेतल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने यापुढेही शासनाच्या योजना व अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सभापती हर्षदा वाळके यांनी कलमठमध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघरांसाठी एकाच ठिकाणी घरकुले उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कलमठ ग्रामपंचायतीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हास्तरीय सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभासाठी गावाची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीने मागील चार वर्षांत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेताना अशा प्रथा न पाळणाऱ्या कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. तसेच बेघरांसाठी एकत्रित घरकुल प्रकल्प राबविण्यात आला असून, शासनाच्या दाखला वाटप उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७५० नागरिकांना दाखले देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिक व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायतीच्या बहुचर्चित प्रधानमंत्री आवास घरकुल प्रकल्पाला मान्यवरांनी भेट दिली. तसेच सीईओ डॉ. बासूर, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्माल्य संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या कलश उपक्रमाचा आणि वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा इंगवले-काळगे, जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय तळवडेकर यांनी केले.
