Headlines

शाळा, शिक्षण वाचवा मंचतर्फे २० रोजी गोपुरीत सहविचार सभा…

२ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन:विविध शैक्षणिक प्रश्नांवर होणार चर्चा..

⚡कणकवली ता.१७-: शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचच्यावतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वामुदे-गोपुरी आश्रम येथे कणकवली तालुका सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याच्या अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षणाची दूरवस्था दूर करण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेत शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

कमी पटसंख्येच्या कारणाने शाळा बंद करू नयेत, गाव, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवावे, एका विद्यार्थ्यासाठीही शाळा सुरू ठेवावी, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक द्यावा, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, तसेच केजी टू पीजी सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, आदी मागण्यांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या सहविचार सभेला पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था-संघटना, डाव्या, पुरोगामी व प्रागतिक चळवळीतील कार्यकर्ते तसेच सजग नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page