Headlines

जुन्या आठवणींना उजाळा देत आरोस हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…

भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती; शाळेच्या प्रगतीसाठी योगदानाचा निर्धार..

⚡सावंतवाडी , ता. १६-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीबाबत विविध विषयांवर संवाद साधला.

शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्र-मैत्रिणींसोबतचे रम्य क्षण, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना या मेळाव्यात पुन्हा उजाळा मिळाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे शाळेचा परिसर जुन्या आठवणींनी भारून गेला.
या कार्यक्रमाला भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिदास सावंत होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निलेश परब, माजी मुख्याध्यापक येजरे सर, नाईक सर, प्रशालेचे मुख्याध्यापक वरक सर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेले शिक्षण व संस्कार याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेच्या पुढील वाटचालीत माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आवश्यक ते योगदान देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
अनेक वर्षांनंतर जुन्या मित्र-मैत्रिणींची झालेली भेट, शिक्षकांच्या आठवणी आणि शाळेतील रम्य क्षणांना मिळालेला उजाळा यामुळे स्नेहमेळाव्याचे वातावरण भावूक आणि आनंददायी झाले. “शाळा तीच, चेहरे नवे; पण आठवणी मात्र सदैव ताज्याच,” अशी भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page